डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमात नावावरून नाराजी; प्रमुख पदाधिकाऱ्यांची पाठ, गावात ‘आदर्श’ राजकारणाची चर्चा

Sep 29, 2026 - 22:21
 0  301
डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमात नावावरून नाराजी; प्रमुख पदाधिकाऱ्यांची पाठ, गावात ‘आदर्श’ राजकारणाची चर्चा

कर्मवीरांच्या जयंती निमित्त डोर्लेवाडीत निमंत्रण पत्रिकेतील नावावरून राजकारणाचा धुरळा!

‘शाळेत राजकारण नको; विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र या’ — युगेंद्र पवार..

कर्मवीर जयंतीत नावांवरून नाराजी; पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची चर्चा..

बारामती : डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून झालेल्या नाराजीची किनार लाभली. विविध गटांमध्ये नावांवरून मतभेद झाल्याची चर्चा असून, काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित जनरल बॉडी सदस्य युगेंद्र पवार यांनी, “आदर्श शिक्षण संस्थेत राजकारण आणू नये. सर्वांनी एकत्र येऊन शाळा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन केले. शाळेची जुनी व जीर्ण इमारत पाडून अद्ययावत वर्गखोल्या, प्रयोगशाळा व सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारण्यात येणार असून, येत्या वर्षभरात काम पूर्ण करून पुढील कर्मवीर जयंती नवीन इमारतीत घेण्याचा शब्द पवार यांनी दिला.

शाळेसाठी तीन कोटी रुपयांची देणगी जाहीर झाल्याचा उल्लेख करत संबंधित देणगीदारांनी रक्कम जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते शहाजी खंडागळे यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्यावर भाष्य केले.

नावांवरून नाराजी नाट्याची चर्चा

दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावांवरून वाद झाल्याची चर्चा आहे. एका माजी कारखाना संचालकाचे नाव पत्रिकेत न छापता नंतर हाताने लिहून पत्रिका वाटल्याने नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार झाल्याचीही चर्चा असून, रविवारी दिवसभर बैठका घेऊन संबंधितांची मनधरणी करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच निमंत्रण पत्रिकेत पंचायत समिती सभापतींचे नाव नसल्याने काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. लोकप्रतिनिधींच्या पतींची नावे पत्रिकेत समाविष्ट करण्यावरूनही मतभेद झाल्याचे बोलले जात आहे.

व्याख्यानापेक्षा ‘नावां’चे राजकारण?

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दरवर्षी नामांकित व्याख्यात्यांना निमंत्रित केले जाते. मात्र राजकीय प्रमुख पाहुणे व पदाधिकारी कार्यक्रमातून लवकर निघून गेल्यानंतर व्याख्यानाच्या वेळी मोजकेच लोक उपस्थित राहतात, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे. कर्मवीरांच्या जयंतीत व्याख्यात्यांचे विचार ऐकण्यापेक्षा नावांसाठी राजकारण कितपत योग्य? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

शाळेच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुविधा मिळाव्यात, हाच कर्मवीरांच्या विचारांना खरा आदर ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow