पुण्यात के. जे. महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
अभियांत्रिकीच्या नव्या पर्वाला ‘दीक्षारंभ’!
के. जे. महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; ध्येय, शिस्त अन् कौशल्यविकासाचा मंत्र
पुणे, दि. २१ : अभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात स्पष्ट ध्येय निश्चित करा, सातत्यपूर्ण अभ्यासासह कठोर परिश्रम, शिस्त आणि कौशल्यविकासाला प्राधान्य द्या, असा संदेश के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमात मान्यवरांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक व्यवस्था, अध्यापन व परीक्षा पद्धती, विविध सुविधा, मार्गदर्शन व्यवस्था तसेच करिअरच्या संधींची माहिती देण्यासाठी प्रवेशपरिचय व दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास के. जे. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव, प्रमुख पाहुणे व सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, संकुल कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, संकुल संचालक डॉ. जयवंत संकपाळ, तांत्रिक संचालक डॉ. अजय फुलंबरकर, विद्यार्थी विकास व कल्याण अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, प्राचार्य डॉ. सुहास खोत यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांचा लाभ घ्या
प्राचार्य डॉ. सुहास खोत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व तांत्रिक सुविधांची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा, विद्युत वाहन प्रयोगशाळा, उद्योजकता व नवउद्योग केंद्र यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पीएचएन टेक्नॉलॉजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या उद्योगांशी महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेहनतीला पर्याय नाही’
“नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक वापर करावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने मेहनत केल्यास यश साध्य करता येते. मेहनतीला पर्याय नाही; शॉर्टकटने यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे,” असे डॉ. सुहास खोत यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांना भावनिक, वैयक्तिक किंवा शैक्षणिक अडचणी असल्यास त्यांनी मार्गदर्शक शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
‘मोठी स्वप्ने पाहा, नियोजनबद्ध प्रयत्न करा’
मेजर जनरल समीर कल्ला यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर उपयोग करून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी, असे सांगितले. चार वर्षांच्या शिक्षणप्रवासात आपल्या क्षमतेचा शंभर टक्के वापर करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नव्या क्षेत्रांतील कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. तर संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव यांनी जिद्द, कष्ट, चिकाटी, ध्येयासक्ती आणि सातत्याच्या बळावर विद्यार्थ्यांनी भविष्यातील वाटचाल घडवावी, असा संदेश दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोहम जाधव, आर्या ढोणे, संकेत झोंबडे, पियुष चंगेडिया, कुणाल पिंगळे आणि धनश्री पिंगहाटे यांचा उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल भोई यांनी केले. प्रा. संदिप सहाणे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
What's Your Reaction?