बारामतीत प्रथमच ‘टायटॅनिक प्रदर्शन’; इतिहास, मनोरंजन आणि खरेदीचा अनोखा संगम
बारामतीत प्रथमच ‘टायटॅनिक प्रदर्शन’; इतिहास, मनोरंजन आणि खरेदीचा अनोखा संगम
तीन-चार एकर परिसरात उभारले टायटॅनिकचे भव्य मॉडेल; रोमांचक राईड्स, शॉपिंग झोन आणि फूड कोर्टची पर्वणी
बारामती : प्रतिनिधीबारामतीकरांना इतिहासाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता यावा, यासाठी डी.जे. अम्युझमेंट्सच्या वतीने प्रथमच भव्य 'टायटॅनिक प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. तीन ते चार एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनात टायटॅनिक जहाजाची भव्य प्रतिकृती, जहाजातील विविध खोल्यांचे वास्तवदर्शी मॉडेल, ऐतिहासिक कलाकृती तसेच १४ एप्रिल १९१२ रोजी घडलेल्या टायटॅनिक दुर्घटनेची माहिती आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहे.
प्रदर्शनात इतिहासाबरोबरच मनोरंजन आणि खरेदीचीही मोठी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व वयोगटांसाठी 'मौत का कुवा', जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, भूत बंगला, सलाम्बो यांसारख्या रोमांचक राईड्स उभारण्यात आल्या आहेत. तर लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, पेडल बोट, जंपिंग गेम्स आदी विशेष आकर्षणे ठेवण्यात आली आहेत.
प्रदर्शन परिसरात उभारलेल्या शॉपिंग झोनमध्ये घरगुती वस्तू, खेळणी, क्रीडा साहित्य, फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित विविध उत्पादने उपलब्ध आहेत. फूड कोर्टमध्ये पाणीपुरी, चाट, पॉपकॉर्न, कॉटन कँडी, मिरची भजी, आईस्क्रीम, दिल्ली अप्पलमसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असून आकर्षक फोटो पॉइंट्समुळे कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण टिपण्याची संधीही उपलब्ध झाली आहे.
पत्रकार परिषदेत प्रदर्शनाचे व्यवस्थापक रवी एन. नायर यांनी माहिती देताना सांगितले की, विकसित बारामतीत हे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळणे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यापूर्वीही बारामतीत कार्यक्रम आयोजित करताना मिळालेल्या सहकार्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. या भव्य प्रदर्शनाची संकल्पना सी. के. दिनेशकुमार आणि सी. के. जयप्रकाश यांची असून पत्रकार परिषदेला के. के. जयराज व संतोष जाधव उपस्थित होते.
हे प्रदर्शन क्रोमा शोरूमजवळ, स्वातंत्र्यसैनिक संभाजीराव गालिंदे नगर, सहयोग सोसायटीसमोर, भिगवण रोड, बारामती येथे सुरू असून विद्यार्थी, पर्यटक, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन इतिहास, मनोरंजन आणि खरेदीचा अविस्मरणीय अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
What's Your Reaction?