झारगडवाडीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने ठेकेदार अमर जाधव काळ्या यादीत..
झारगडवाडीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने ठेकेदार अमर जाधव काळ्या यादीत..
रस्त्याची आणि इतर निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदाराला मोठी चपराक..
बारामती : झारगडवाडी ( ता.बारामती ) येथील रस्त्याचे निकृष्ट काम केल्याने ठेकेदार अमर संजय जाधव याला महाराष्ट्र शासन पुणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक वर्षासाठी प्रतिबंध घालत त्या ठेकेदाराची एजन्सी एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना मोठी चपराक बसली आहे.
झारगडवाडी ( ता.बारामती ) येथील सन 2022 23 मध्ये नागरी सुविधा मधून मंजूर असलेल्या 15 लक्ष रुपयांचे रस्त्याचे काम अमर संजय जाधव या ठेकेदाराला मिळाले होते. या ठेकेदाराने 22 सप्टेंबर 2022 रोजी काम करून कामाचे बिल अदा करून घेतले होते. मात्र झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची माहिती समोर आली होती याबाबत सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कामाची लेखी तक्रार झारगडवाडी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीतील बांधकाम अधिकारी यांच्याकडे केली होती. ग्रामपंचायत झारगडवाडीने संबंधित ठेकेदार अमर संजय जाधव यांना या रस्त्याचे काम खराब झाले असून ते दुरुस्त करुन देण्याबाबत कळविले होते. तसेच बांधकाम उपविभागामार्फत सुध्दा दोन स्मरणपत्रे देण्यात आली होती परंतु संबंधित ठेकेदारामार्फत ही कामे दुरुस्ती करण्यात आली नाहीत. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत संबंधित ठेकेदार याला काळ्या यादीत समावेश करणे संदर्भात उपविभागाला कळविले होते त्या अनुसरून उपविभागा मार्फत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली त्यामध्ये रस्त्याचा पृष्ठभाग निकृष्ट व खराब झाल्याचे आढळून आले असे संबंधित विभागाला कळवले होते ठेकेदाराने उपविभागाच्या पत्रास कोणताच प्रतिसाद दिला नाही व रस्ता दुरुस्ती संदर्भात त्याची उदासीनता दिसून आली. दिलेल्या संदर्भीय पत्रांमुळे उपअभियंता यांनी वरील ठेकेदारास काळ्या यादीत समावेश करण्यासंदर्भात शिफारस केली होती.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शासन निर्णय क्रमांक सीएटी. २०१७ प्र. क्र. 8/ इमा. 2 दि. 29/01/2019 मधील प्रकरण ७ नुसार पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या निविदा प्रक्रियेकडे भाग घेण्यास आदेशाच्या दिनांक पासून एक वर्षासाठी प्रतिबंध करण्यात आले असल्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
युवराज पोटे ( सामाजिक कार्यकर्ते ) - शहर व ग्रामीण भागात ठेकेदार जास्त पैसे मिळण्याच्या हव्यासापोटी अंतर्गत रस्त्यांची निकृष्ट कामे करतात. ठेकेदार काम करत असताना संबंधित अधिकाऱ्याने देखील लक्ष देणे गरजेचे आहे मात्र अधिकारी देखील याला तेवढेच जबाबदार असतात. बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील अंतर्गत रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याचे समोर आले होते याबाबत ठेकेदाराला रस्ता दुरुस्त करण्याच्या नोटिसादेखील देण्यात आल्या मात्र या नोटिशीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली होती यामुळे त्या ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला अखेर 10/3/2026 ला अमर जाधव या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे त्याला एक वर्षासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे मात्र रस्ता दुरुस्तीचे सर्व निकष जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील.
What's Your Reaction?