बारामतीतील झारगडवाडीत विषारी केमिकल युक्त ताडी विकणाऱ्या दोघांच्या मुस्क्या तालुका पोलिसांनी आवळ्या..

Jan 27, 2026 - 16:10
Jan 29, 2026 - 20:57
 0  307
बारामतीतील झारगडवाडीत विषारी केमिकल युक्त ताडी विकणाऱ्या दोघांच्या मुस्क्या तालुका पोलिसांनी आवळ्या..

बारामती मध्ये विषारी ताडी विक्रीचा पर्दाफाश..

मानवी जीवितास घातक अश्या केमिकल च्या तीस लिटर विषारी ताडीसह बारामती पोलिसांकडून दोघे अटकेत..

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे मानवी जिवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लिटर विषारी ताडी व ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रासायनिक पावडर जप्त केली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ता. २५ जानेवारी २०२६ रोजी सायं.५ वाजण्याच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झारगडवाडी येथे एका इसमाकडून बेकायदेशीर व विषारी ताडीची विक्री सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात चिन्नया दत्तु गुत्तेदार (वय ३२, रा. झारगडवाडी) हा इसम घराच्या भिंतीच्या आडोशाला पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बकेटमध्ये विषारी ताडी विक्री करताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडून ३० लिटर मानवी जिवाला घातक अशी ताडी जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या घराची पाहणी केली असता, एका प्लास्टिक पिशवीत साखरेसारखी दिसणारी क्लोरोहायड्रेट (Chloral Hydrate) ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडर सापडली. चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली. तसेच सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबु भंडारी (रा.सणसर ता.इंदापूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यास सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. उर्वरित विषारी ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिन्नया गुत्तेदार व बाबु भंडारी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १२३ (दहा वर्षे शिक्षा) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस अमलदार मनोज पवार, सौरभ तुपे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, दादा दराडे, आफ्रिन शेख यांनी केली आहे.

चौकट : बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावांमध्ये अनेक वर्षापासून बेकायदेशीर विषारी केमिकल युक्त ताडी विकली जात होती. याबाबत गावातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र त्यांच्याकडून अवैद्य धंदे करणाऱ्यांना अभय देण्याचे काम केले जात होते. झारगडवाडी, डोर्लेवाडी, सोनगांव गावातील विषारी केमिकल युक्त ताडी पिल्याने अनेक जणांचा जीव गेला आहे अनेक महिलांचा संसार उघड्यावर आला आहे. अनेक लहान लहान मुले पोरकी झाली आहेत. विषारी केमिकल युक्त ताडी बंद व्हावी यासाठी झारगडवाडी, डोर्लेवाडी, सोनगांव, मेखळी गावातील नागरिकांनी अनेक वेळा उठाव केला होता आंदोलने करण्यात आली होती यावर विषारी केमिकल युक्त ताडी विकणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून मात्र तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जात होती. बारामतीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त याठिकाणी नावालाच आहे अशी परिस्थिती आहे. बारामती तालुका आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत हे अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी स्वतंत्र विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे आहे मात्र हा बारामतीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून गप्प असल्याची परिस्थिती आहे. बारामतीत राज्य उत्पादन शुल्क विभाग कुठे आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow