बारामती : दिशा फाउंडेशनचे कार्य दीपस्तंभासारखे प्रेरणादायी; राज्यभरातील २५ उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
दिशा फाउंडेशनचे कार्य दीपस्तंभासारखे प्रेरणादायी.
राज्यभरातील २५ उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव..
बारामती : शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि संशोधन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिशा फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती येथे झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातून निवड झालेल्या २५ उपक्रमशील, गुणवंत आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शिक्षणासोबतच कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि संशोधन क्षेत्रात फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून गुणवंत व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा गौरव करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी किशोरशेठ शहा (सराफ) यांनी दिशा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना, “दिशा फाउंडेशनचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून अनेकांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे,” असे गौरवोद्गार काढले. राज्यभरातील उपक्रमशील व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा सन्मान करणे ही स्तुत्य बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकाने केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा तसेच त्यांच्या सहवासातील अनुभवांचा उल्लेख करत त्यांच्या शिक्षकवृत्ती, ज्ञानाची तळमळ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या क्षमतेविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर राज्यातील विविध भागांतून आलेल्या २५ गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन करण्यात आलेल्या या गौरवामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला समीर चव्हाण, माजी सभापती, बांधकाम समिती, बारामती, अविनाश निकाळजे, नगरसेवक, बारामती नगरपरिषद, विद्या प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र टिळेकर, तसेच पुणे जिल्हा परिषद नाट्यस्पर्धा संयोजन समितीचे सचिव प्रकाश खोत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध कवी विनोद खटके यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला साहित्यिक रंगत आणली. शिक्षकांच्या कार्याचा गौरव, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. ‘उपक्रमशील शिक्षक म्हणजे परिवर्तनाचा शिल्पकार’ हा संदेश या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला. गुणवंत शिक्षकांचा सन्मान आणि विधायक सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्याची दिशा फाउंडेशनची भूमिका भविष्यातही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
What's Your Reaction?