बारामती जनतेने दिलेला कौल मी विनम्रतेने स्वीकारतो.. ॲड. नितीन भामे
बारामती नगरपरिषदेत जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रतेने स्वीकारतो..
पराभव ही यशाची पायरी असते; त्यामुळे इथून पुढच्या काळात जोमाने जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू - ॲड. नितीन भामे
बारामती: बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला निर्णय आम्ही पूर्णतः मनःपूर्वक आणि विनम्रतेने स्वीकारतो. हा निकाल आमच्यासाठी शेवट नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याची ही एक नवीन सुरुवात आहे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. नितीन रामचंद्र भामे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आहे.
निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना ॲड. भामे म्हणाले की, "या निवडणुकीत ज्या मतदारांनी आम्हास मतदान केले, तसेच ज्यांनी केले नाही, त्या सर्व ज्ञात-अज्ञात मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जनतेने दिलेला कौल शिरसावंद्य मानून आम्ही पुन्हा एकदा जनसेवेसाठी सिद्ध होत आहोत. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा पराभव स्वीकारण्याची आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद आम्हाला मिळते."
राजकीय भूमिकेवर स्पष्टीकरण: "महायुतीत सत्तेत सहभागी असूनही, स्थानिक पातळीवर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. ही भूमिका तसेच भारतीय जनता पक्षाची स्थानिक भूमिका मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो नाही, हे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मान्य करतो. महायुती अस्तित्वात असतानाही ही निवडणूक लादली गेली, हे स्थानिक पातळीवर महायुतीचेही अपयश असल्याचे आम्हाला मान्य आहे."
पुढील संकल्प: "एक दिवस आम्ही नक्की जिंकेन, हा ठाम विश्वास आम्हाला स्वतःवर आणि बारामतीकरांवर आहे. आता आम्ही पुन्हा नव्याने आपल्यामध्ये राहून, सतत जनतेच्या संपर्कात राहून आणि आपल्या प्रश्नांना समजून घेत अधिक प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करत आहोत. मतदारांच्या सूचना आणि आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहतील. नेहमीप्रमाणे आपला विश्वास आणि साथ आमच्यासोबत राहील, हीच आमची नम्र अपेक्षा आहे," असेही ॲड. नितीन भामे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
What's Your Reaction?