उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या माळेगांव सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामासाठी उसाला पहिली उचल दिली 3300 रुपये..
उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील या कारखान्याचा एफ. आर. पी. या हंगामासाठी ३२७० रुपये प्रति टन इतका निश्चित झाला आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ३० रुपये जास्त म्हणजेच ३३०० रुपयांची आगाऊ रक्कम देण्यास संचालक मंडळाने संमती दर्शवली.
गेल्या काही दिवसांपासून सभासद शेतकऱ्यांमध्ये माळेगाव कारखाना साखरेच्या पहिल्या उचल रकमेबाबत काय भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता होती. विशेषतः सोमेश्वर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या उचल रकमेची घोषणा केल्यानंतर माळेगाव कारखान्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी ३३०० रुपये प्रति टन इतकी उचल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
What's Your Reaction?