बारामतीतील कृषी प्रदर्शनास ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, प्रतिभाताई पवार यांनी विविध दालनांची केली पाहणी
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी प्रदर्शनास भेट देत विविध दालनाची केली पाहणी..
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास राज्याच्या विविध भागांतून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लातूर, धाराशिव, वाशीम, नांदेड, बीड, जालना, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, सौ. प्रतिभा पवार यांनी प्रदर्शनास भेट देत विविध दालनांची पाहणी केली. मधुमक्षिका दालनामध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी मधमाशी पालनाबाबत नृत्यकलेच्या माध्यमातून माहिती सादर करणाऱ्या बालिकांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढविला. शेतीसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर मोठ्या उत्साहाने भेट देत होते. या प्रदर्शनात खते, कीटकनाशके, बियाणे, सूक्ष्म सिंचन प्रणाली, तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक यंत्रसामुग्री, तेलाचा घाणा यांचा समावेश करण्यात आला होता.
याच दिवशी प्रदर्शनाच्या अनुषंगाने ‘वर्किंग ब्रीड’ व ‘पप्पी’ या जातींच्या श्वानांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना केव्हीके, बारामतीचे माजी विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सदर श्वान स्पर्धेसाठी निवड समितीमध्ये डॉ. बी. एन. आंबोरे, डॉ. ए. व्ही. खानविलकर, डॉ. टी. सी. शेंडे (पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ) तसेच श्री. तेजस कळमकर, पुणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
श्वान स्पर्धा – विजेते व पारितोषिके :
• प्रथम क्रमांक: श्री. किरण दळवे, बारामती – ब्रीड: ग्रे हाउंड | रु. ५,०००/- व ट्रॉफी,
• द्वितीय क्रमांक: श्री. आकाश दळवे, बारामती – ब्रीड: जर्मन शेफर्ड | रु. ३,०००/- व ट्रॉफी
• तृतीय क्रमांक: सौ. ज्योती सातव, वाघोली (पुणे) – ब्रीड: लॅब्राडोर | रु. २,०००/- व ट्रॉफी
What's Your Reaction?